माझी शाळा :- माझी ज्ञानप्रबोधिनी रूपातील माता






गढीवरची शाळा..
          धुळे जिल्ह्यातील कापडणे हे आमचे मूळगाव.  काल  एका उत्तरकार्यासाठी गावात गेलो होतो. आमच्या गढीवरच्या शाळेची इमारत खूपच आकर्षक आणि मजबूत आहे.काल शाळेत जाऊन जेव्हा इमारत पाहिली,तेव्हा सर्व जुन्या आठवणी मनात दाटून आल्या. काल  शनिवार २२-०६-२०१९,अर्धा दिवस शाळेचा. मुख्याध्यापक आणि शिक्षक बांधवांच्या सोबत थोडीशी शैक्षणिक चर्चा केली.अतिशय उत्साही वातावरण दिसले.माझी बालपणीची शाळा पाहून खूपच आनंद झाला.
कापडणे गावात एकूण चार जि.प.शाळा आहेत. सुरूवातीला नंबर एक शाळा 1893 यावर्षी सुरू झाली.  ती शाळा फक्त मुलांसाठी होती.नंतर नंबर दोन शाळा आली .ही शाळा सुध्दा मुलांचीच होती.नंतर स्रीशिक्षणाचा प्रवाह आला आणि नंबर तीन आणि नंबर चार या दोन्हीही मुलींच्या शाळा सुरू झाल्या. नंबर एक शाळेतील मी विद्यार्थी. "हम दो,हमारे दो" हा आजचा काळ. त्या काळात मात्र मुलांना नंबर दिलेले असत. मुलांची जन्मावरून ज्येष्ठता यादी बनत असे. मोठा मुलगा म्हणजेच नंबर एक ,दुसरा मुलगा म्हणजेच नंबर दोन,तिसरा मुलगा म्हणजेच नंबर तीन.मुलींनाही असे नंबर असत. एक,दोन,... या क्रमांकांचा पहिला वापर मुलांचा कुटुंबातील क्रमांक आणि नंतर घरांचा क्रमांक,गल्लींचा क्रमांक यांसाठीच जास्त वापरला जात असे.त्यामुळेच शिक्षण खात्यातील शाळांचे क्रमांक कमी प्रमाणात वापरले जात असत.
          आमच्या गावातील मराठी शाळांना  काही नावे दिलेली होती. नंबर एकची शाळा म्हणजेच गढीवरची शाळा. नंबर दोन म्हणजेच माळीवाड्याजवळची शाळा. नंबर तीन शाळा म्हणजेच झेंडाचौकातील दत्त मंदिराच्या जवळची शाळा आणि नंबर चारची शाळा म्हणजेच दरवाजा मागील शाळा. अहिराणी बोलीभाषेनुसार तशी नावे दिलेली होती आणि नावे देताना शाळेच्या जवळचे ठिकाण आधी सांगायचे.
          शिक्षक बांधव मात्र या शाळेला भागशाळा म्हणत असत. त्या काळात एडीआय हे शैक्षणिक क्षेत्रातील मोठे अधिकारी पद होते आणि त्यांचे ऑफिस या शाळेत होते.आजूबाजूच्या चाळीस पन्नास गावातील शाळांचा सर्व व्यवहार इथूनच होत असे. या शाळेतील मुख्याध्यापक गावातील बॅंकेतून पगार आणत आणि दुसऱ्या शाळेतील मुख्याध्यापक पगार नेत असत. मुख्याध्यापक दिसले की मुले एकदम शांत बसत. मुख्याध्यापकांना    मोठे गुरूजी म्हणत असत. मुख्याध्यापकांकडे तक्रार  नेणे म्हणजे पोलिस स्टेशन पेक्षाही मोठा धाक होता. मुख्याध्यापकांना तुझे  नाव सांगतो👉 ऐकताच विद्यार्थी गप्प बसत असे. या शाळेतील मुख्याध्यापक म्हणजे  खूपच मोठे मानाचे पद मानले जात असे.
          इयत्ता पहिली आणि दुसरीला गुरूवर्य कै.शिवदास सोनू भामरे आणि इयत्ता तिसरी-चौथीला कै.हिरालाल लोटन पाटील हे गुरूजी होते. दोन्हीही गुरुजींनी याच शाळेत मला घडविले.
          शाळेचे दोन भाग आहेत आणि त्यांना एकत्रित करणारी एक कमान आहे. या शाळेने मला खूपच दिले.आज मी माझ्या पायावर उभा आहे,ते फक्त या शाळेमुळे.. गढीवरची शाळा म्हणजेच माझी ज्ञानरूपी अमृत  पाजणारी आई आहे.त्या ज्ञानरूपी अमृतानेच माझे शैक्षणिक जीवन घडले आहे.
अशा या जि.प.शाळारूपातील
माझ्या ज्ञानप्रबोधिनी मातेस 
माझा मानाचा मुजरा..
🙏🙏🙏 
अनिल तुकाराम शिनकर,
सर,मनमाड,
माजी विद्यार्थी,
जि.प.शाळा नं.एक,
कापडणे,ता.जि.धुळे.
इयत्ता :- पहिली (१९८२-८३)





















1 comment:

कु.सायलीदिदी अनिल शिनकर,मनमाड. said...

माझ्या गावाची माहिती ...
खूपच छान माहिती...

प्रत्ययकारी शब्दकोश-भाग पहिला पुस्तक परिक्षण

वार :- गुरूवार, 02-11-2023. *स्थळ :- जि.प. कार्यालय नाशिक.* 📖📖📖📖 *मा.अमिशा मित्तल मॅडम, सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो...